चला झाड होऊया........


चला झाड होऊया.....


                तीन आठवड्यापूर्वी गावाकडे STबस ने यायचा योग्य आला.हा रस्ता तसा गेली अनेक वर्षे माझ्या पाहण्यातला अन ओळखीचा आहे.यावेळी जाताना सोबत ओळखीचं दुसरं कोणीच नव्हते.सगळे प्रवाशी माझ्यासारखेच प्रवासाला निघाले होते.प्रत्येक जण आपआपल्या मोबाईल मध्ये व्यस्त होता...क्वचितच गप्पा होत होत्या.मग मी सुद्धा बसमधून   आजूबाजूला पाहत होतो.सकाळी लवकर निघाल्यामुळे वातावरण एकदम ताजतवानं होतं. त्यामुळे निसर्गाच्या दिवसाची सुरुवात पाहणं हाच माझ्यासाठी एक पर्याय उरला.
             
     प्रत्येक गावाच्या रस्त्यावर शेती, छोटी मोठी हॉटेल्स यांच्या बरोबरीने ठळकपणे जाणवणारी एक बाब म्हणजे वडाची झाडे.गेली अनेक वर्षे मी ही झाडे पाहतोय.आज ती पाहताना मनात सहज एक विचार आला की ही झाडे कोणी लावली असतील? किती वय असेल यांचे? अजून किती वर्षे ही टिकतील? विचार करता करता ध्यानात आले की या झाडांचे वय माझ्या आजी आजोबांच्या वयापेक्षा नक्कीच जास्त असेल.पुढे मी हयात नसलो तरी ही झाडे असणारच आहेत.

             वडाच्या झाडाच्या दीर्घायुष्य असण्याचे नेमकं रहस्य काय? मुळात वडाची झाडे न लावताच उगवून येतात.आपल्याला जमिनीवर जेवढे वडाचे झाड दिसते त्याच्या अनेकपट जमिनीखाली त्याच्या मुळा चा विस्तार आढळतो.म्हणजे जमिनीच्यावर एक फूट झाड वाढले तर जमिनीच्या पोटात किमान दहा फूट खाली त्यांच्या मुळांची वाढ झालेली असते.भीषण दुष्काळमध्ये ही वडाची झाडे हिरवीगार दिसतात.प्रचंड विस्तारामुळे त्यांना कुठेना कुठेतरी पाणी सापडतेच.

                आपलं व्यक्तिमत्त्व वडाच्या झाडासारखेच असायला हवे.आपली मुळे जमिनीत खट्ट रोवलेली  असायला हवीत.वरूण दिसणारा विस्तार किती आहे याचा विचार न करता दररोज आपली मुळे खोलवर नेण्याचे काम आपण सुरू ठेवायला हवे.दगड फोडून पाणी शोधणाऱ्या वडाच्या झाडांच्या मुळाप्रमाणे प्रतिकूलतेवर  मात करून योग्य ती संधी शोधण्याचे कौशल्य आपण अंगी निर्माण केले पाहिजे.

              'यश' हे नेहमी वडाच्या झाडासारखे असते.ते आधी जमिनीत रुजते आणि मग जमिनीच्या वर अंकुर फुटतो.झाडाची मुळे जितकी खोल तितकी त्याची उंचीही जास्त असते.तितकेतच तो दीर्घायुषी पण ठरतो.कुंडीत लावलेल्या मोगऱ्याच्या झाडाला भलेही लवकर आणि सुंदर फुले येत असतील. पण कुंडीत पाणी टाकलेच नाही तर ते झाड लवकरच मरून जाते.महाकाय झाडांचे तसे होत नाही.त्यांची मुळे खोलवर गेलेली असल्याने त्यांना बाहेरून पाणी द्यायला लागत नाही.आपले पाणी स्वतःच शोधण्याचे कसब त्यांनी मिळवलेले असते.

                स्पर्धा परीक्षेत किंवा आयुष्यातील कोणत्याही परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर आपली मुळे वडाच्या झाडासारखी जमिनीत खोलवर न्यायला हवीत.आपले व्यक्तीमत्व समृध्द करण्यासाठी त्याचे विविध पैलू मुळासारखे दररोज विकसित करायला हवेत. या दररोजच्या वाढीतूनच आपले यशाचे झाड दोलदारपणे उभे राहते.त्याला येणारी फळे,फुले ही अनेक वर्षे चाखत राहता येतात.भलेही कितीही उशीर होऊ द्या,कितीही संकट येऊ द्या पण तुम्ही यासाठी मागे हटू नका.मग पुन्हा एकदा करा सुरुवात आणि व्हा झाड....अगदी वडासारखे!

अमोल भोसले.

टिप्पण्या

  1. अतिशय सुंदर असा लेख आहे. आपल्या सभोवतालच्या गोष्टीदेखील किती काही न कळत सांगून जातात, जसे ते वडाचे झाड. 👌

    उत्तर द्याहटवा
  2. निसर्ग प्रेमीच अशा प्रकारे चे वास्तव मांडू शकतो.. छान

    उत्तर द्याहटवा
  3. आपले विचार या वडाच्या मुळाप्रमाने खोल आहेत आणि विचार ही वडाच्या पारंब्याप्रमाने दुरवरचे पाहण्याची आहेत.

    उत्तर द्याहटवा
  4. खुपच छान...मोटिवेशनल लेख आहे.
    दररोज काही चिंतन, मनन, वाचन, नवीन गोष्टी आत्मसात करत रहा, आणि त्या झाडांप्रमानेच आपली मुळे मजबुत बनवत रहा. आपण स्वतः
    एकमेव व्यक्ती आहेत जे स्वतः ला परिपूर्ण ओळखतो, आणि स्वतः मध्ये बदल घडवू शकतो, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची. मग आपले व्यक्तिमत्व देखील वडाच्या झाडासारखे महान बनेल, आणि त्याच्या सावलीचा आश्रय, फायदा अनेकांना होईल. एक गोष्ट नक्की की, आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून आत्मविश्वासाने कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत. शेवटी एकच सांगेल की, वाईट गोष्टी संपवत रहा आणि झाडांसारखीच जगाला सुंदरता देत रहा.

    -शिवाजी पाटील

    उत्तर द्याहटवा
  5. आपण किती विकसित होत आहोत हे दाखवण्यापेक्षा मुळा सारखी वाटचाल करत रहावी नक्कीच तुमचं यश वडा च्या झाडा प्रमाणे सदैव बहरत राहील😇👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मैत्री....

साधुत्वाचा पूजक : लोकराजा शाहू महाराज....

"Yoga and Health"