"आधुनिक महाराष्ट्राचा उत्तुंग हिमालय:लोकराजा राजर्षी शाहू महाराज".
"आधुनिक महाराष्ट्राचा उत्तुंग हिमालय:लोकराजा राजर्षी शाहू महाराज".
महाराष्ट्र ही संताची, राष्ट्रनायकांची, क्रांतिवीरांची, सामाजिक झटणा-ऱ्या सुधारकांची आणि मानवतेच्या मूल्यांची स्थापना करण्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांची, विचारवंताची भूमी राहिलेली आहे. याच भूमीमध्ये प्रागतिक विचारांची मुहूर्तमेढ रोवली गेली, विकसित झाली, प्रसरण पावली आणि अधोगामी विचारधाराही निपजली. प्रत्येक वेळी प्रागतिक विचारधारेची सरशीच झाली असे नव्हे; परंतु महाराष्ट्रातील जनतेने प्रागतिक विचारांना बळ देण्याचे काम केले. इतिहासाच्या पानापानांवर गर्दी करून राहिलेल्या घटनांमध्ये, सुवर्णाक्षरांनी नोंदवाव्यात अशा काही व्यक्ती व घटना आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचे एकजीव असे समाजमन घडविण्याचा कसोशीने प्रयत्न केला.आणि या आधुनिक महाराष्ट्राला सुंदर राजमहाल ज्या अनेक क्रांतिकारक कार्यातून झाला; त्या अनेक शिल्पकारांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे, कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी शाहू महाराज होत.
छत्रपती राजर्षी शाहूंनी ज्या काही समाजपरिवर्तनाच्या चळवळी बांधल्या, विकसित केल्या; किंबहुना त्यांना आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि बौद्धिक बळ दिले, ते समजून घेणे महत्त्वाचे आहे. राजर्षी शाहूंची वैचारिक मूस समजून घेण्यासाठी त्यांनी सन १९१६ ते १९२२च्या दरम्यान विविध व्यासपीठांवरून जी सोळा भाषणे दिली, त्यांची चिकित्सा करणे, त्यांची वैचारिक भूमिका समजून घेणे आणि आजच्या काळात त्यांच्या विचारांची प्रासंगिकता तपासणे अधिक महत्त्वाचे आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी ज्या अनेक सामाजिक संघटनांच्या व्यासपीठावरून ही भाषणे दिली आहेत, त्यांची नावे, संघटनांच्या कामाचे स्वरूप, या संघटनांच्या समाज परिवर्तनाच्या बद्दलच्या जाणीवा जरी डोळ्यासमोर आणल्या, तर भाषणांचे सामाजिक, ऐतिहासिक महत्त्व ध्यानी येईल.
ग्रीक तत्त्ववेत्ता अॅरिस्टॉटल म्हणाला होता, की राजा हा तत्त्ववेत्ता असला पाहिजे. राजर्षी शाहू ख-ऱ्या अर्थाने तत्त्ववेत्ता राजे होते. तत्कालीन राजांची बांधिलकी ही भोग, विलास, कुटुंब विकास आणि केवळ मांडलिकत्वापुरती मर्यादित होती. शाहू महाराजांची बांधिलकी ही गरीब, अज्ञानी, दुबळ्या अस्पृश्यांप्रती होती, हे त्यांच्या भाषणांमधून दिसून येते. पीडितांचे अश्रू पुसणे, हेच त्यांचे जीवित कार्य होते. विशेषत: शिक्षणाच्या माध्यमातून दुबळ्यांचे सशक्तीकरण होऊ शकेल, ही त्यांची पक्की धारणा होती. खामगाव येथील शिक्षण परिषदेत बोलताना ते म्हणाले, की शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही, असे इतिहास सांगतो. महाराज हे निव्वळ बोलके सुधारक नव्हते, तर कर्ते सुधारक होते. म्हणूनच आपल्या संस्थानात १९१७मध्ये मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा त्यांनी केला. राज्यारोहण प्रसंगी संस्थानात १९० शाळा आणि ११,३९९ विद्यार्थी शिक्षण घेत होते. सन १९२२ मध्ये ५९० शाळा आणि ३१,०९६ विद्यार्थी शिक्षण घेत होते. शिक्षणावर सहा टक्के खर्च करणारा हा पहिला राजा होय. अस्पृश्यांच्या उद्धाराची संजीवनी म्हणजे विद्यामृत होय, असे त्यांना वाटत असे. अस्पृश्य वर्गाच्या परिषदेत विचार मांडताना ते म्हणाले, 'अस्पृश्यांनी पूर्वापार चालत आलेल्या धंद्यांना चिकटून न राहता, प्रतिष्ठित व्यवसाय काबीज केले पाहिजेत. अस्पृश्यांनी आपल्या उन्नतीसाठी मि. भीमराव आंबेडकरांचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवावे.' राजर्षी शाहू शिक्षणासंबंधी अत्यंत डोळस होते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. आपल्या अनेक भाषणातून त्यांनी शिक्षणाचा महिमा गायला आहे. येथे शाहू महाराज स्वत:ला म. फुलेंच्या शिक्षणासंबंधी मूलभूत चिंतनास जोडून घेतात. गरीब, अज्ञानी आणि दुबळ्या माणसांचे सशक्तीकरण शिक्षणातूनच होऊ शकेल, अशी त्यांची प्रगाढ धारणा दिसून येते.
राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक प्रश्नांवर परखड भाष्य केले आहे. अस्पृश्यता व जातिभेद यांचा प्रश्न, वर्णव्यवस्थेची चिकित्सा, समानतेचे तत्त्व, सामाजिक नीतिमत्ता, विधवा विवाह, पडदा पद्धती, दबलेले समाज घटक (शेतकरी, मजूर आणि स्त्रिया), कृषि कर्म, सहकार तत्त्व इत्यादी बाबींचा त्यांनी ऊहापोह केला आहे.
समाज एवढा हीन अवस्थेत का जगतो आहे, याबद्दलही त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता दिसून येते. सामाजिक नीतिमत्तेची वाढ हे समाजसुधारणेचे महत्त्वाचे अंग आहे, असे त्यांना वाटे. म्हणूनच ब्राह्मणेतरांनी सामाजिक हीन स्थितीतून मुक्त होण्याचे युद्ध निकराने लढण्याची आवश्यकता आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते. शाहूंनी जातिव्यवस्था मोडण्यासाठी २५ आंतरजातीय विवाह घडवून आणले.
आपल्या जन्मदिनी (१९०२) या राजाने संस्थानात अस्पृश्य समाज घटकांसाठी ५० टक्के आरक्षणाची घोषणा केली. केवळ घोषणाच नाही, तर तसा आदेशही काढला. शाहू महाराज येथेच थांबले नाहीत, तर मागासलेल्या लोकांना त्यांच्या प्रगतीसाठी भावी राज्यघटनेत 'जातवार प्रतिनिधीत्व' मिळाले पाहिजे (१८९८) असा क्रांतदर्शी विचार मांडला. मजूर, शेतकरी व स्त्रिया हे मागासलेले वर्ग होत. त्यांनी हक्कांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे, अशी त्यांची दृढ धारणा होती.
अस्पृश्यांनी आपल्या हक्कांप्रती सजग राहिले पाहिजे, हे त्यांचे मत होते. महाराजांनी माणगावच्या परिषदेत 'आपल्या जातीचा पुढारी करा,' असे म्हणत, बाबासाहेब हेच आता अस्पृश्यांचे नेते आहेत. त्यांच्यापासून आपण प्रेरणा घ्यावी, असा भविष्यवेधी विचारही मांडला. त्यातून त्यांचे बाबासाहेबांवरील अढळ प्रेम आणि कर्तृत्वावरील अभिक्रमावरचा विश्वास दिसून येतो.
राजर्षी शाहूंना मजुरांप्रती कळवळा होता. श्रमिकांबद्दल ममत्व होते. मजूर वर्गामध्ये हक्कांची जाणीव निर्माण झाली पाहिजे. संघटनात्मक बांधणी झाली पाहिजे. त्यांना आपल्यातल्या स्वत्वाची ओळख घडली पाहिजे, यासाठी मुंबई व परळ येथे भरलेल्या कामगार मेळाव्यास त्यांनी संबोधित केले. या दोन्ही भाषणांमध्ये त्यांनी आपल्या हक्कांसाठी झगडा व भारतातही ब्रिटनप्रमाणे मजुरांचे संघ निर्माण झाले पाहिजेत, असा पथदर्शी विचार मांडला. मजुरांमध्ये लढाऊ वृत्तीचे बीजारोपण शाहूंनी केले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. केवळ विचार मांडूनच ते थांबले नाहीत, तर कृतीशील कार्यक्रमाची जोडही त्यांनी दिली.
धर्माविषयी शाहूंचे मूलभूत असे आकलन, चिंतन होते. धर्म हा नीतिवान, चरित्र्यसंपन्न व शीलवान नागरिक घडविण्यासाठी आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. धर्माच्या बाबतीत त्यांनी जी दोन भाषणे नवसारी (गुजरात) आणि भावनगर (सौराष्ट्र) येथे दिली, त्यातून त्यांचा धर्मासंबंधी दृष्टिकोन दिसून येता. आर्यधर्म समता व राष्ट्रैक्य वाढवील आणि आर्यधर्म विश्वव्यापी धर्म बनेल, अशी त्यांची मांडणी होती. अर्थात, शाहूंवर आर्यधर्म आणि सत्यशोधक समाज यांचा प्रभाव अनुभवण्यास मिळतो.
वास्तविक पाहता, धर्माच्या बाबतीत अतिशय परखडपणे ते म्हणाले, 'व्यक्तीच्या दृष्टीने धर्माची बाब महत्त्वाची असेल; पण राष्ट्रीय बाबतीत ती केव्हाही आड येता कामा नये. यापुरती धर्म ही बाब फारच कमी महत्त्वाची आहे, असे मला वाटते.' धर्माच्या बाबतीत असे विचार विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मांडणे, धाडसीपणाचेच होते.
राजर्षी शाहूंनी आपली दोन प्रेरणास्थळे मानली आहेत. त्यात न्या. महादेव गोविंद रानडे आणि गोपाळराव गोखले यांचा समावेश होतो. त्याबरोबरच ऋषी दयानंद यांच्या विचार आणि कार्याचाही प्रभाव दिसून येतो. आर्य धर्माच्या प्रसारामुळे भिन्न भिन्न जाती, पंथ व धर्म यांमध्ये एकोपा निर्माण होऊन, भारतात राष्ट्रैक्याची भावना वाढीस लागेल आणि म्हणूनच धर्माच्या बनावटी रूपास त्यांचा विरोध होता. तीर्थांचे काल्पनिक माहात्म्य वाढविणाऱ्यांना ते फटकारतात. 'उपाध्याय सांगेल ती पूर्व दिशा व भट सांगेल ती अमावस्या' या प्रवृत्तीला ते नकार देतात. वेदोक्त प्रकरणानंतर ते पौरोहित्य शिकवणाऱ्या शाळा उघडतात आणि बहुजन समाजातील तरुणांनी पौरोहित्य शिकावे, पुढच्या काळात करावे, यासाठी कृतीशील कार्यक्रम देतात. त्याचबरोबर हेही सांगायला विसरत नाहीत, की जी धर्मव्यवस्था तुम्हाला पशुप्रमाणे वागविते, त्यापासून स्वतंत्र व्हा. स्वराज्याविषयीची संकल्पना मांडताना ते म्हणाले, की इंग्रज अधिकाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घेऊन, ती विद्यासंपन्न अशा अल्पसंख्याक ब्राह्मण वर्गाच्या हाती देणे मला बिलकूल पसंत नाही. शाहू हे काही ब्राह्मण द्वेष्टे नव्हते. उलट टिळकांच्या आजारपणात मिरजेस आणावे, असा संदेश त्यांनी दिला होता. बालगंधर्वांस मदत करण्याचे कामही त्यांनी केले होते.
राजर्षी शाहूंच्या जी काही भाषणं केली होती त्या सोळा भाषणांमधून समाजक्रांतीच्या विचारांची मूळ संहिता दृष्टिपथास येते. या सर्व भाषणांमधून राजर्षींचे पुरोगामी विचार व्यक्त होतात. त्यांनी अनेक सामाजिक समस्यांचा वेध घेतलेला दिसून येतो. विषयांतील वैविध्य, समकालीन प्रश्नांची जाण आणि भान, दुबळ्या माणसांच्या सक्षमीकरणासंबंधी मूलभूत विचार, स्त्री-शुद्रांप्रती कळवळा, पक्की वैचारिक बैठक, आपल्या विचारांवर, भूमिकांवर ठाम राहण्याची वृत्ती, श्रमिक (शेतकरी, मजूर), अस्पृश्य, वंचित, उपेक्षित वर्ग समूहांना प्रकाशात आणण्याची धडपड, परखडपणा, सामाजिक नीतिमत्ता, बौद्धिक स्वातंत्र्य, मागासलेल्या समाजाचा उद्धार, व्यापार, धंदे, कारखानदारी इत्यादी अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय व आर्थिक विषयांचा ऊहापोह त्यांनी केला आहे. यातून त्यांच्यात असलेली अभ्यासू वृत्ती, चिंतनाची खोली, नम्रतेचा गुण, आपलेपणाची भावना पाहायला मिळते. स्वातंत्र्य हे माणसास प्रिय असले पाहिजे, असा मूलभूत विचारही ते देतात. ते म्हणतात, 'स्वातंत्र्यासाठी जीव द्या, काय वाटेल ते करा; परंतू तुम्हाला जे पशुप्रमाणे वागवितात, त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळवा.' शाहूंचा हाच क्रांतदर्शी विचार या शतकात प्रेरणादायी ठरू शकेल. आजच्या तारखेला(६ मे 1922) रोजी त्यांचं मुंबईत निधन झाले.महाराज गेले याचा धक्का संबंध महाराष्ट्राला सहन झाला नाही...
सर्वांगाने भोगी जीवन ,
तरीही ज्याच्या उरी विरक्ती,
साधुत्वाचा गेला पूजक,
खचली,कलली श्रीशिवशक्ती...
त्यांच्या आज होणाऱ्या 100 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन....
अमोल नंदा शिवाजी भोसले.
६ मे 2022
राजश्री शाहू महाराज यांना स्मृती दिना निम्मित अभिवादन.......🙏🙏🙏
उत्तर द्याहटवामहाराजांचे विचार अजरामर आहेत..ते अजून हि आपल्याला मार्ग दर्शक आहेत...
आभारी आहे.
उत्तर द्याहटवाखूप छान .....
उत्तर द्याहटवाTy दोस्ता
हटवाछान
उत्तर द्याहटवाTy साहेब
हटवामार्मिक लेखन आहे, खरोखरच डॉ आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे ते सामाजिक लोकशाहीचा खांब होते
उत्तर द्याहटवाआभारी आहे सर.
उत्तर द्याहटवा