प्रवाह ....

              प्रवाह...
                     भूतकाळ,वर्तमान काळ आणि  भविष्य काळ अशा तीन टप्यात आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची विभागणी होते. जिथे वर्तमानकाळ अस्तित्वात आहे  तिथे भूतकाळ न चुकता तयार होत जातो.वर्तमान आणि भूत यांचं अस्तिव टिकून राहण्यासाठी भविष्यकाळाला यावेच लागते.या तिन्हींच्या चक्रामध्ये फिरणाऱ्या माणसाला नेमके कुठे असावे याविषयी खात्रीच येत नाही.
                                पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या एकसलग वाहत शेवटी समुद्राला जाऊन मिळतात.नद्यांचे हे वाहणे हे आपल्या सगक्यांच्या आयुष्यासारखे आहे.उगमापासून ते समुद्रापर्यंत चाललेला हा प्रवास अविरतपणे सुरू असतो.पण या प्रवासाच्या कोणत्या भागाला जगणे म्हणायचे असा प्रश्न आपल्याला वारंवार पडत राहतो.भूतकाळात रममान होऊन तसे काहीच हाती लागत नाही.भविष्यकाळ हातात नसल्याने त्यात गुंग होऊनही हाती काहीच येत नाही .हे सगळे सिध्दांताच्या पातळीवर कुठूनही प्रत्यक्ष जगताना मात्र नेमकेपणाने वळत नाही.
                        कुठल्याही नदीच्या प्रवाहात जेव्हा जेव्हा आपण उतरतो तेव्हा तेव्हा ती नदी पुर्णतः नवीनच असते.कालचीच नदी आज वाहत आहे किंवा    गेल्या वर्षीचीच नदी यावर्षीही वाहते आहे असे आपला केवळ भ्रम असतो.प्रत्येक क्षणाला नदीचा पाण्याचा प्रवाह बदलत असतो..राहतो. नदीच्या पाण्यात आपण जिथे कुठे उतरू तिथे आपल्याला स्पर्श करून पुढे जाणारा प्रवाह कायमचाच निघून जातो.त्या क्षणाला आपल्याला स्पर्श करणाऱ्या पाण्याचे थेंब हाच त्या वेळचा आपला प्रवाह असतो.आपण जिथे उभे आहोत त्याच्या वरच्या बाजूला असणारे पाणी अजून आपल्याकडे यायचे आहे आणि खालच्या बाजूला असणारे पाणी आपल्यापासून कायमचे निसटून गेलेले असते.
                     वाहत्या नदीची ही तऱ्हा अगदी तंतोतंत आपल्या आयुष्यात आढळते.माझे माझे म्हणून आपण मिरवत असलेले आयुष्य क्षणाक्षणा च्या रुपाने अखंडपणे वाहत असते.आपला आत्ताच्या श्वास सुरू असतानाचा क्षण तेवढा आपला असतो.बाकी आधीच्या श्वासासोबत आलेले क्षण आपल्याला सोडून कायमचे निघून गेलेले असतात.आपल्या आताच्या श्वासानंतर पुढे येऊ घातलेल्या श्वासा बरोबर येणारे क्षण आपले आहेत की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही.
                    निसटून गेलेले क्षण आठवणीत जरूर राहतात .पण आताचे जगणे जिवंत ठेवण्यासाठी त्या आठवणी पुरेशा ठरत नाही.जे क्षण अजून आपल्याला अजून मिळालेच नाहीत त्यांच्याविषयी आपल्या मनात आडाखे बांधण्यापलीकडे आपण फारसे काही करू शकत नाही.जे काही करायचे आहे ते आताच्या क्षणातच करू शकतो. एकदा का तो क्षण संपला की त्याच्यासोबतचे आपले जगणेही संपून जाते.
                          आयुष्याचा हा प्रवाहीपणा वेळीच ओळखून त्यात जिवंतपणा आणायला हवा.प्रवाही असणे हाच आपल्या आयुष्याचा मूलधर्म आहे.प्रवाहामुळेचं त्यात नित्याने नावीन्य येत राहते.प्रवाही असल्यामुळेच आयुष्य कुंठत नाही,साचत नाही.प्रवाहाचे वास्तविक रूप जाणून घेऊन त्याच्यासोबत वाहता येणे ही जिवंतपणे जगण्याची खरी कला आहे.ती कला जितक्या लवकर आपण आत्मसात करू तितका आपला जिवंतपणा वाढत राहील.

अमोल शिवाजी भोसले.
20 डिसेंबर 2020

टिप्पण्या

  1. जगायचं तर वर्तमानात कारण भूतकाळ हा कधी काळी आपला होता आणि भविष्यकाळ आपला असेलच हे कोणीही सांगू शकत नाही...😇

    उत्तर द्याहटवा
  2. "In life two days never come,one is yesterday and another one is tomarrow".- Dalai Lama
    So enjoy your present movement...
    Well written Amol ..it proves you have unterstood life's equation.

    उत्तर द्याहटवा
  3. खुपच छान 👌👌 जगायचे तर वर्तमानकाळात, अगदी खरय... किती चांगले होईल ना, की जेव्हा माणुस देखील नदी सारखा जगायला लागेल. आपले कर्तव्य करत चालत राहायचे, ना स्वार्थ ना घमंड, अखंड प्रवाहीत. जेव्हा असा माणुस जगायला लागेल तेव्हा खर्या अर्थाने भगवतगीतेतील हा श्लोक​​कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन' सत्यात उतरेल. आणि जीवन देखील सुखद होईल. यालाच मी खरा आदर्श महापुरुष/स्त्री म्हणेल.
    आणि कधी कधी भुतकाळ देखील आनंद देतो, जसे डाँकडाऊन च्या काळात काहीच नवीन करण्यासारखे नव्हते मग भूतकाळातील आठवणींच्या कपाटातुन आठवणी बाहेर काढुन त्यांना कुरवाळत बसायचो मी,पण कोणत्या आठवणी बाहेर काढतोय हे ही तितकेच महत्त्वाचे नाहीतर वर्तमान गढूळ करून टाकतो भुतकाळ. पण क्षणभंगुरच होते ते, काही काळासाठी. परंतु वर्तमान आपलाच असतो सतत सोबत करणारा. वर्तमाना मुळेच भविष्य आणि भूतकाळाला अर्थ प्राप्त होतो. आणि भूतकाळामुळे वर्तमान कायमचा जीवंत राहतो नि भविष्य पुढे असल्याने वर्तमान जगण्याला प्रेरणा मिळते. अर्थात ह्या तिन्हींमुळे जीवनात रस आहे नाहातर आयुष्य निरस झाले असते.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मैत्री....

साधुत्वाचा पूजक : लोकराजा शाहू महाराज....

"Yoga and Health"