युगप्रवर्तक छत्रपती......

       

        इतिहासाचा एक आंधळा अभिमान हा एक शाप आहे.तर इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे.इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे.या भूमिकेतून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण होणे नवल नाही.महाराजांचे चरित्र चिंतन हा अनेकांच्या अभिमानाचा,जिव्हाळ्याचा विषय आहे.अनेक देशभक्त ,समाजसेवक,राजकारणी,संशोधक,आणि आपल्या सारखे जनसामान्य यांना सुद्धा महाराज प्राणप्रिय आहेत याला अपवाद नाही.300 वर्षांपूर्वी महाराजांनी देहत्याग केला तरी त्यांचा किर्तीदेह महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यात अजूनही तेजाने तळपतो आहे.
         छत्रपती शिवराय यांचे जीवन हे अनेकांच्या जीवनाचे विधान आहे .अनेकांचे ते स्फुर्ती स्थान आहे. या श्रीमंतयोगींचे आज स्मरण करताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.महाराजांचा इतिहास सगळ्याना अगदी तारखेनुसार पाठ आहे.महाराज जन्माला आले ते एका गडावर अन या जगाचा निरोप घेतला तो दुसऱ्या गडावर.महाराष्ट्र्याच्या गडकोटांनी महाराजांच्या आयुष्याला एक भौगोलिक अन सांस्कृतिक विचारांचं अधिष्ठान प्राप्त करून दिल.महाराजांच्या जीवनावर अनेकांनी ग्रंथ लिहले,सिनेमे काढले,पुतळे उभे केले,स्मारके उभारली पण हा आकाशाएवढा महापुरुष कोणत्याही कलाकृतीच्या मिठीत सामावला नाही.
        महाराजांनी जिथे केवळ लोक होते तेथे समाज निर्माण केला.जिथे केवळ भूमी होती तिथे राष्ट्र निर्माण केले.एकाच समान धाग्याच्या माळेत असणाऱ्या मोत्यांची सर असावी तसे महाराजांचे आचरण होते.दुर्जनाना धाक वाटावा अन सज्जनांना अभय वाटावे अशी एक आदर्श समाजव्यवस्था शिवछत्रपती यांनी इहलोकी प्रत्यक्षात निर्माण करून दाखवली.महाराजांचे एकूण व्यक्तिमत्त्व असे संपन्न होते.आपल्याला पाहिजे असणारे असंख्य पैलू पाहिले तर मला महाराज असे कोण होते हे कळेनासे होते.अभ्यासक म्हणतात महाराज विचारवंत होते ..पण विचारवंताच्या जीवनात अभावानेच आढळणारी क्रियाशीलता महाराजांच्या जीवनात आढळून येते.महाराज काही संत नव्हते पण त्यांच्या विचारला ,आचरणाला एकूण त्यांच्या चारित्र्याला साधुत्वाचा सुंगध येत असे.कोणत्याही प्रलोभनाच्या आहारी न जाणारे निकोप अन निरामय मन त्याना लाभलेले होते.ते ईश्वरनिष्ठ होते .जगदंबेच्या गाभाऱ्यात कवड्यांची माळ घालून ,पोत पाजळून तिला कौल मागण्याएव्हढे आस्तिक होते.पण प्रयत्नकेल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही हे कळण्या इतपत जाणतेही होते.महाराज प्रवाह पतित नव्हते,गर्दीबरोबर जाणारे नव्हते.लोकांना आश्वासनाची खैरात आजच्यासारख्या करणाऱ्या राजकारनासारखे न्हवते.पण तरीही आजच्यापेक्षा अधिकच पराकाष्ठाचे लोकप्रिय होते.महाराज कोणत्याही विद्यापीठाचे विध्यार्थी नव्हते पण विद्यसंपन्न असणाऱ्यांची सगळे लक्षणे त्यांच्या ठायी होती.महाराज सर्वांची कदर करणारे युगपुरूष होते.महाराजांची योजकता अन उद्योजकता यांचे पुरावे इतिहासाच्या पानोपानी आपल्याला भेटतील.राज्यव्यहाराच्या राज्यकोशाची रचना तयार करण्यासाठी त्यांनी विद्वानांना पाचारण केले पण सिंहगड सर करण्यासाठी  त्यांनी तानाजीला पाठवले.
आपले क्षत्रिय सिद्ध करून त्यांनी आपल्या प्रियजनांचे  त्यांनी समाधान केले.त्याचबरोबर त्यांनी धर्मातरांचे शुद्धीकरन करून आपल्या नेमक्या दृष्टिकोनाची वाट दाखवून दिली.
    "शक्तीने पावती सुखे,
      शक्ती नासता विटंबना"
हे महाराज ओळखून होते.या शक्तीसाधनेचा भाग म्हणून त्यांनी महाराष्ट्र भर गडकोटावर दुर्ग उभे केले.तानाजी अन बाजी यांच्यासारखे नरदुर्ग शोधून काढले.परकीय शक्तीशी भावी काळात लढा द्यावा लागणार हे ओळखून त्यानी मराठ्यांचे आरमार उभे केले.आपले सैन्य कमी पडू नये यासाठी गावागावातून अनेक लढवय्ये तयार केले.तेही जाहिरात न देता गुणवान माणसे मिळू शकतात हे महाराजांनी सिद्ध केले.पण कर्त्यापुरुषाच्या ठायी शोधकता असल्याशिवाय हे शक्य नाही.ही महाराजांच्या लक्षणांची माळ होती.
     काही राजकारण्यानी स्वतःला मुसद्दी म्हणवून घेतात. पण तत्वशून्यता अन विरोधकांचा दुस्वास हेच आजच्या लोकसेवकांच्या मुसद्दीपणाचे ठळक लक्षणाचे मर्म आहे.ते आजही चालुच आहे.
        महाराज यांच्यानंतर औरंगजेबचा मृत्यू झाला पण मराठे अजिंक्य राहिले याला एकच कारण म्हणजे महाराज यांनी प्रत्येक मावळ्यात सवाई शिवाजी निर्माण केला.शिवरायांनी न्यायनीतीचा अन देशभक्तीचा वारसा मागे ठेवल्याने त्यांच्यापश्चात लाल जरीचा फेटा अन भगवा तेजाने लखलखत फडकत ठेवण्याचे काम त्यांच्या अष्टप्रधान मंडळ अन लाखो मावळ्यांनी केले.

      स्वराज्य हा रानावणातला वणवा न्हवता तो पेटून उठलेल्या राष्ट्राची ती कमाई होती. याची जाणीव राजमाता जिजाऊ साहेबांनी आपल्या राजा ना दिली.शिवाजी महाराज इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर त्यांची अनेक अभ्यासपूर्ण चरित्रे मोठ्या संख्येने प्रसिद्ध झाली असती.केवळ भाबड्या भक्तीचे पलिते गाती घेऊन घटनेवर प्रकाश पडू शकत नाही हे समजणारे अभ्यासक विदेशात आहेत.आपल्या देशात केवळ संशोधन म्हणून राष्ट्रपुरुशांचे चिंतन केले जाते.त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तंत्र म्हणजे जयंत्या ,पुण्यतिथी साजरी करून त्यांना देवघरात स्थान दिले आहे.म्हणजे आपला कार्यभाग आटोपला असे वाटते.अन आजकाल तासभराचे कार्यक्रम करून तो कार्यभाग साधून घेतला जातोय.समाजाच्या भाग्यविधात्यांना न्याय मिळावा असे आपणास वाटत असेल तर त्यांच्या चरित्राचा अन चारित्र्याचा परिसस्पर्श   आपल्या जीवनाला घडविने हे आपले कर्त्यव्य आहे.


शिवजयंती उत्सव हा राष्ट्रीय सणांप्रमाणे साजरा करावा असे लोकमान्यांनी सांगितले.पण हा उत्सव लोकशक्तीच्या संस्कृती साठी साजरा करावा अशी त्यांची अपेक्षा होती.ते आज प्रत्ययास येत आहे.


@जय शिवराय...

अमोल शिवाजी भोसले.                          

टिप्पण्या

  1. खपत छान. अगदी परीपूर्ण असा लेख आहे. आणि एक गोष्ट की केवळ जयंती साजरी केल्याने काहीच साध्य नाही होणार, आज विकृतीकरण करून टाकलेय लोकांनी, एका दिवसापुरते शिवाजी महाराजांचे मावळे असल्याची नौटंकी करायची आणि बाकीचे दिवस त्यांच्या विचारांची पायमल्ली करायची. हे थांबायला हव. महाराजांचे विचार मना-मनात, रक्तात, बुध्दीत भिनले पाहीजेत, तेव्हाच आपण खरे मावळे. मी म्हणेल की केवळ वाचू नका जर जगा रोजच्या दैनंदिन जीवनात महाराजांचे विचार, आजार. मग बघा कशा चारी दिशा उजळुन निघतील तुमच्या अस्तित्वाने.

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर लेख आहे .महाराजांचे जीवन चरित्र काय होतं आणि आता सध्या काय चालू आहे याचं वास्तव दाखवणारा लेख आहे

    उत्तर द्याहटवा
  3. छान ' लेख लिहला आहे . लेखातील भाषा सुंदर आहे . हा लेख प्रेसला दयावयास हवा होता किमान लोकशिवजयंतीनिमितTन तरी वाचले असते . चला असेच वेळ मिळेल तेव्हा लेखन करत चला

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम ,👍🙏🙏. महाराजांचा गौरवशाली इतिहास आज ही मार्ग दाखवणारा आहे .. महाराजांच कर्तुत्व हिमालया एवढं उत्तुंग होते. म्हणूनच इतिहासाने रयतेचा महानराजा अशी नोंद करून ठेवली आहे..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मैत्री....

साधुत्वाचा पूजक : लोकराजा शाहू महाराज....

"Yoga and Health"