"आतला ज्वालामुखी......"

"आतला ज्वालामुखी "


 
           संपूर्ण प्रयत्न केले असता यश मिळते अस आपण आजपर्यंत खूपदा ऐकत आलो.पण संपूर्ण प्रयत्न म्हणजे नेमके किती प्रयत्न हे मात्र अचूकपणे सांगितले जात नाही.अर्धवट प्रयत्न केले असता यश मिळत नाही हे ही खरंच आहे.पण आपण करीत असलेले प्रयत्न कोणत्या मर्यादेपर्यंत अपूर्ण असतात आणि कोणत्या मर्यादेनंतर पूर्ण होतात हे समजणे  म्हणजे यशाची गुरुकिल्ली सापडण्यासारखेचं आहे.
 

  आपण इयत्ता 5 पाचवी नंतर भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये शिकलो आहेत की पृथ्वी च्या गर्भात अत्यंत तप्त असा शिलारस सदैव फिरत असतो.हा रस सतत पृथ्वी च्या पृष्ठभागावर येण्यासाठी धडपडत असतो.त्यासाठी आतून एकसारखे धक्के देत असतो.जेव्हा त्याचे प्रयत्न यशस्वी होतात तेव्हा तो ज्वालामुखीच्या रूपाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर अवतीर्ण होतो.त्याचे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आलेले यशस्वी रूप आपल्याला लाव्हारसाच्या रूपाने दिसते.

पृथ्वीच्या आतून ज्वालामुखीच्या रूपाने बाहेर येण्यासाठी तप्त शिलारसाची चाललेली ही धडपड प्रत्येक वेळी यशस्वी होतेच अस नाही. जेव्हा त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हा तो रस आतल्या आतच  थंड होऊन त्याचे खडकात रूपांतर होते.ज्वालामुखीच्या रूपाने यशस्वी होण्यासाठी त्या रसाला एका अटीची पूर्तता करावी लागते.बाहेर पडू इच्छिणाऱ्या शिलारसाला पृथ्वीच्या आतील खडकांचा प्रचंड विरोध असतो.या विरोधावर मात करणे जेव्हा त्याला शक्य होते तेव्हाच तो एक यशस्वी ज्वालामुखी बनतो.

         आतील खडकांचा विरोध झुगारून देण्यासाठी शिलारसाला स्वतःची ताकद एकवटावी लागते.अत्यंत संयमाने सातत्य पूर्णरित्या त्या रसाला आपल्या शक्तीचा साठा करावा लागतो.हा साठा करत असताना,आपली ताकद वाढवत असताना त्याला खूप शांत राहावे लागते. आपली ताकद कितपत एकवटली आहे याचा अंदाज घेण्याचा आततायीपणा त्याला टाळावा लागतो. कारण अशी घाई अथवा असा आततायीपणा म्हणजे पदरात अपयशच पडणार हे नक्कीचं. जोपर्यंत संपूर्ण विरोध उलथून टाकून यशस्वी उद्रेक करण्याइतपत ताकद एकवटली जात नाही तोवर उद्रेकासाठी कोणताही प्रयत्न न करणेच त्याच्या हिताचे असते.एकदा का ही किमान मर्यादा गाठली की मग एक घाव आणि दोन तुकडे ....यशस्वी उद्रेक करण्यापासून त्याला कोणताच विरोध थांबवू शकत नाही अगदी स्वतः चा सुद्धा...

        आपल्याला इच्छित असणारे ध्येय गाठण्यासाठीदेखील प्रयत्नशील पराकाष्ठा करावी लागते. प्रचंड संघर्ष करावा लागतो. पण स्वतःची ताकद पूर्ण विकसित झाल्याशिवाय धडक मारली तर पदरी अपयशच येते.हमखास यशस्वी उद्रेक करायचा असेल तर प्रचंड सयंम पाळायला हवा.स्वतःला सिद्ध करण्याची कसलीच घाई न करता स्वतःच्या तप्तपणाची ताकद शांतपणे वाढवीत रहायला हवे,स्वतःला एकवटत ठेवायला हवे,अलिप्त रहायला हवे.वारंवार छोट्याछोट्या धडका मारून सतत कपाळमोक्ष करून घेण्यापेक्षा पूर्ण ताकद लावून प्रभावी धडक मारण्यासाठी स्वतःला तयार करून ज्वालामुखीसारखा महाउद्रेक जमायला हवा.



अमोल शिवाजी भोसले.



टिप्पण्या

  1. अतोनात प्रयत्न करणे हे जिंकण्यासाठी आवश्यक आहेच पण निश्चित यश प्राप्ती साठी अचूकता आणि संयम हा हवाच हे या लेखातून उत्तम रित्या मांडले आहे...☺️👍

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान मांडणी, मोडीवेशनल. सगळ्यांसोबत राहून अलिप्त राहता आले पाहीजे ही खरी कला आहे(emotional intelligence). Perfect practice makes a man perfect.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मैत्री....

साधुत्वाचा पूजक : लोकराजा शाहू महाराज....

"Yoga and Health"