"केरळा स्टोरी " : सत्य कि अजेंडा....?



दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी आपल्या देशातील सर्वांत साक्षर मानल्या जाणाऱ्या राज्यातील भयानक वास्तव अत्यंत चतुराईने पडद्यावर मांडली आहे. कशा पद्धतीने सर्व धर्माच्या निर्दोष महिलांना कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तर कधी धमकीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जातं, याचं चित्रण मनाला अस्वस्थ करणारं ठरतं. ‘द केरळ स्टोरी’सारखा विषय मोठ्या पडद्यावर मांडणं सहजसोपं नाही. मात्र सुदीप्तो यांनी दिग्दर्शक म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. यातील संवादसुद्धा अत्यंत विचारपूर्वक लिहिण्यात आले आहेत.
 ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट मात्र ‘द कश्मीर फाइल्स’ने निर्माण केलेल्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन राजकीय तसेच धार्मिक मतभेद निर्माण करणारा, त्यांना प्रोत्साहन देणारा आणि समाजात एक तेढ निर्माण करणारा चित्रपट आहे.
एक अनुभव हा चित्रपट सामान्य लोकांच्या मनावर किती खोलवर परिणाम करतो हे मला सांगून गेला. तसं पाहायला गेलं तर ही फार किरकोळ गोष्ट आहे, पण ‘द केरला स्टोरी’मुळे याच छोट्याछोट्या गोष्टींतून लोकांच्या मनामधील धार्मिक द्वेष जाणवायला हा एक अनुभवच माझ्यासाठी पुरेसा आहे. धर्म, जात वगैरे सगळं सोडा पण काही प्रसंग अनुभवल्यानंतर आपण माणूस म्हणून कोणत्या दिशेने वाटचाल करतोय याची प्रकर्षाने जाणीव झाली.
आज ज्या पद्धतीने ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला एक मोहीम असल्यासारखं प्रमोट केलं जात आहे, ज्या पद्धतीने त्याचे मोफत शोज लावून जसा काही हा शाळेच्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचा विषय असल्यासारखं नवीन मुलांमध्ये रुजवलं जात आहे, ते कुठेतरी थांबायला हवं. ‘द कश्मीर फाइल्स’बघून बाहेर पडणारी व्यक्ती ही डोळ्यात अश्रू घेऊन आली होती, तर ‘द केरला स्टोरी’ पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडणारी व्यक्ती ‘आपणही असंच कट्टरवादी व्हायला पाहिजे’अशा प्रकारची विधानं करत आहेत. इथे एक माणूस म्हणून आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला समजलं पाहिजे की, चित्रपटातून काय घ्यायचं आहे?

याचा अर्थ केरळमध्ये असा कोणताही प्रकार झालाच नाही का? तर नाही, केरळमधील परिस्थिती ही चिंताजनकच आहे, पण त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी इतरही बरीच साधनं आहेत. केवळ माथी भडकवणाऱ्या, चिथवणाऱ्या चित्रपटांमधून समाजाचं प्रबोधन होणार नाही. त्यासाठी इतर मार्ग आहेत ते अवलंबले पाहिजेत. कीर्तनाने समाज सुधरत नाही अन् तमाशाने समाज बिघडत नाही, तसंच असे प्रचारकी चित्रपट दाखवून समाज त्यातून योग्य बोध न घेता त्यात आणखी दरी निर्माण होते हे मला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने आणि त्यामुळे समाजात निर्माण झालेल्या वातावरणाने पटवून दिलं आहे. यातून आपण वेळीच बोध घेतला तर ठीक, नाहीतर पुढे सगळंच कठीण होऊन बसेल.

©अमोल नंदा शिवाजी भोसले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मैत्री....

साधुत्वाचा पूजक : लोकराजा शाहू महाराज....

"Yoga and Health"